शिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Showing posts with label marathi medium. Show all posts
Showing posts with label marathi medium. Show all posts

Thursday, 1 June 2017

मराठी माध्यमातील मुलांनी “इंग्रजी भीती” वर विजय मिळवण्यासाठी


मराठी माध्यमातुन इंग्रजी माध्यमात जाताना, कॉलेजच्या शेवटच्या वर्गात असलेलया विद्यार्थ्यासाठी “प्लेसमेंट” सुरु झाले होते आणि मी मी म्हणणारे हुशार विद्यार्थी सुद्धा बिथरलेले दिसत होते. म्हणून अशाच एका ‘हुशार’ विद्यार्थ्याला बोलावून विचारलं की “काय रे ८०% मार्क असताना का घाबरतोस?” – तो म्हणाला “मॅडम मी मराठी शाळेतून शिकलोय”!
तेव्हा डोक्यात प्रकाश पडला की बहुतेक मराठी माध्यमाची पोरं निव्वळ ‘मराठी’ असल्याच्या न्यूनगंडामुळे मागे पडत चालली आहेत. म्हणजे ज्यांना इंग्रजी येत ते सुद्धा मी मराठी माध्यमातून शिकलोय, इंग्रजी शाळेतलया मुलांसमोर बोलताना मी चुकणारच अशा पूर्वकल्पना करूनच बोलतात किंवा किंबहुना बोलतच नाहीत आणि आयुष्याच्या उमेदीच्या क्षणी ठेचकळतात.

ज्या लोकांना या चक्रव्यूहातून बाहेर यायचे असेल त्यांच्यासाठी काही टिप्स:

१. मराठीचा अभिमान असावा पण म्हणून इंग्रजीचा द्वेष करू नये
कोणतीही नवीन भाषा शिकल्याने आपल्याला फायदाच होणार आहे हे लक्षात ठेवा आणि इंग्रजी शिकल्यामुळे तुमच्यातला मराठीपणा कुठेही लोप पावणार नाही हे ही समजून घ्या.

२. इंग्रजी वर्तमानपत्र आठवड्यातून तीनदातरी वाचा
आणि त्यातलया पाच शब्दांचे अर्थ समजून घ्या, शब्दसंग्रह जितका वाढवाल तितकाच तुमचा आत्मविश्वास पण वाढेल

३. इंग्रजी सिनेमे, मालिका नियमित पहाण्याचा प्रयत्न करा
सुरुवातीला उपशीर्षकां (subtitles) सहित पहावे.
(तरीही पहिले ५ सिनेमे कळणार नाहीत!) पण निराश न होता प्रयत्न चालू ठेवावेत १० सिनेमांनंतर तुम्हाला subtitles शिवाय सिनेमे समजू लागतील. या मुळे नवीन इंग्रजी शब्द आणि त्याचे उच्चार तुमच्या कानी पडतील आणि इंग्रजीतून विचार करण्याची प्रक्रिया आपोआप सुरु होईल.

४. रोज अर्धातास तरी बोलणे
मित्र, मैत्रीण , आई बाबा किंवा आरसा यांच्या पैकी कोणा एका सोबतका होईना रोज अर्धातास बोला, ( काही सुचत नसेल तर पाहिलेल्या इंग्रजी सिनेमातले डायलॉग म्हणा, किंवा स्वतःबद्दल बोला, म्हणजे तुमचं नाव शाळा वगैरे) – मग तुमच्या चुका तुम्हालाच लक्षात येतील आणि या चुका पुढे होणार नाहीत याची काळजी घ्या.

५. पुस्तक फक्त वर्तमानपत्र वाचून शब्दसंग्रह वाढवणं कठीण आहे. इंग्रजी साहित्याला शिवल्याशिवाय त्या भाषेवर विजय मिळवणे कठीण आहे. त्यामुळे महिन्यातून एकदा का होईना एक पुस्तक जरूर वाचावं. सुरुवातच करायची असेल तर सुधा मूर्तींच्या पुस्तकांपासून करा , इंग्रजी किती सोपं आहे हे ती पुस्तकं सांगतात…!
आणि सर्वात महत्वाची गोष्ट –
तुम्ही मराठी माध्यमातून शिकलाय ही समस्यां नसून एक संधी आहे. तुम्ही तुमची मातृभाषा पूर्णपणे आत्मसात केली असल्याने तुम्ही तिचा तर आस्वाद लुटताच (तुम्हाला पु.ल. कळतात…!) आता तुम्हाला नवीन भाषा शिकण्याची संधी देखील मिळत आहे हे ध्यानात ठेवा. हे ही लक्षात ठेवा की इंग्रजी ही आपली भाषा नसल्यामुळे तिचा वापर करताना आपल्याकडून चूक होण्याची शक्यता आहेच, फक्त चुकांची पुनरावृत्ती होणार नाही एवढं पहा.
तुमच्यासमोर अनेक लोक असे असतील जे मराठी माध्यमांतून शिकले पण असाखळीत इंग्रजी बोलतात. त्यांनी देखील वरील ५ युक्त्याच वापरल्या आहेत ह्याची खात्री बाळगा…आणि आत्मविश्वासाने कामाला लागा…!

श्रुती कुलकर्णी